सध्या वांगी, अंबक, देवराष्ट्रे तसेच परिसरातील शेतकरी अत्यंत गंभीर परिस्थितीत आहेत. पाण्याचे प्रमाण अपुरे असल्यामुळे ऊस शेतीसह इतर पिके पाण्याअभावी वाळू लागली असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे.
ताकारी उपसा सिंचन योजनेतून रब्बी हंगामासाठी पाणी तात्काळ सुरू करण्याची मागणी होत असताना, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ताकारी पाटबंधारे कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
“पाणी मिळाल्याशिवाय उठणार नाही!”असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन ताकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
ताकारी पंपगृह क्र. 1 येथील संबंधित अभियंत्यांनी येत्या 25 नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्या वेळेपर्यंत पाणी न आल्यास शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे.
तसेच, आपण वेळेत पाणी सोडले नाही किंवा कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तर दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ताकारी पंपगृह क्र. 1, देवराष्ट्रे येथे आपल्या कार्यालयासमोर खळखट्याक स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे मनसेच्या वतीने अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे पाठबंधारे मंडळ सांगली यांना निवेदन देण्यात आले होते.
यावेळी मनसे अध्यक्ष विशाल शिंदे, सतीश येताळ, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.विशाल मोहिते, माजी सरपंच विजय होनमाने, अजय शिंदे, मोसीन पटवेकरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या नंतर प्रशासनाला खडबडून जाग आली व तत्काळ पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




Post a Comment
0Comments