वांगी :
मौजे अंबक (ता. कडेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीचे सर्वे नंबर ७२८ आणि ७२९ या जागेत अनधिकृपणे केलेले अतिक्रमण काढण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले होते.
याची गंभीरपणे दखल घेवून गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यामुळे ग्रामस्थांनी अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण स्थगित केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गावातील काही लोकांनी अतिक्रमण करून खोकी घातली आहेत. या खोक्यामुळे शाळेचे पावित्र्य धोक्यात आले होते.
शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
वारंवार मागणी करूनही प्रशासन गंभीर होत नसल्याने उपसरपंच रोहित जगदाळे, जयदीप पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती समोर आमरण उपोषण चालू केले होते.
सदर उपोषणाची गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी गंभीरपणे दखल घेवून उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी कायदेशीर कारवाई करून शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
तसेच एक महिन्यात जिल्हा परिषद शाळेच्या संपूर्ण जागेची शासकीय मोजणी करून सदरची जागा अतिक्रमण मुक्त करुन देणेचे आश्वासन दिले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
फोटो ओळ : कडेगाव : अंबक येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी दिल्याने ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले.

Post a Comment
0Comments