सूरज शेख भिलवडी :
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व भिलवडी पोलीस ठाणे कडून मिळालेली माहिती अशी की, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इसम कदमवाडी ते सांगलीवाडी रस्त्यावर बिना नंबर प्लेट ची मोटर सायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सदर ठिकाणी निगराणी करीत असता एक इसम हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला. त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता, त्यास ताब्यात घेऊन, त्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव सुदिप अशोक चौगुले वय वर्षे ३७ राहणार पाटील गल्ली, भिलवडी ता पलूस, जिल्हा सांगली असल्याचे सांगितले.
त्याच्याजवळ असलेल्या मोटर सायकल बाबत विचारणा केली असता, त्याने काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडी बाजारातून सदर मोटरसायकल चोरी केल्याचे व ती विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. त्याचबरोबर त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने मागील काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकल चोरी केल्या आहेत असे कबूल केलें.
त्या मोटरसायकली त्याने वसगडे गावचे हद्दीत शेतामध्ये लावलेल्या असून, त्या विक्री करायच्या आहेत असे सांगितले. सदर प्रकरणाची शहानिशा करीत, दोन पंचा समक्ष सदर ठिकाणी जाऊन, पोलिसांनी नऊ मोटरसायकली ताब्यात घेऊन, पंचनामा केला तसेच सदर मोटरसायकली बाबत पोलीस स्टेशनचा क्राईम अभिलेख पडताळला असता, भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणेस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी भिलवडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता,सुदिप चौगुले याने वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केले बाबतची कबुली दिली. भिलवडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी १२ मोटरसायकली सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या आहेत.आतापर्यंत त्याच्याकडून २१ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून,जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सहा लाख ६३ हजार रुपये इतकी आहे.
सदर आरोपी हा गुन्हेगारी रेकॉर्डवर नसून, तो आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, जास्त वाहने असलेली पार्किंगची ठिकाणे, बिअर बार अशा ठिकाणाहून मोटरसायकली चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,
उपनिरीक्षक कुमार पाटील, नागेश कांबळे, बसवराज शीरगुपी, संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, सुशील मस्के, श्रीधर बागडी,सुरज थोरात, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर ,सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे तसेच,
भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गस्ते, प्रवीण सुतार, भाऊसाहेब जाधव, धीरज खुडे, संतोष जाधव, रोहित माने, सोहेल शेख, सुमित खोत, गणेश शिंदे, प्रकाश पाटील,अरविंद कोळी आदींच्या पथकाने हि कारवाई केली. भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची आजपर्यंतची त्यांची ही सर्वात मोठी कारवाई असून,सदर गुन्ह्याचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहेत.

Post a Comment
0Comments