अल्ताप शिकलगार वांगी:
कडेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे, पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघ प्रक्षेत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील म्हणाले, महायुती सरकारने विविध लोकोपयोगी योजना राबविल्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. यापुढील काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनचे प्रती महिना २१०० रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळणार आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्याचे काम सुरू आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते व धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांची रीघ लागली आहे.
जरी आपण राज्यात महायुती सरकार मध्ये सहभागी असलो तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागले पाहिजे. जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. तसेच त्यांना योग्य न्याय देण्याचे काम करू.
तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे म्हणाले, कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
तालुक्यात कॉंग्रेस, भाजप सारखे मोठे गट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांचा ओढा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका ताकदीने लढणार असल्याचे मोकळे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बळवंत मोरे (अमरापूर), तालुका उपाध्यक्ष सोमनाथ बाबर, बजरंग गुरव, पोपट नावंघरे, जयदीप घोलप, रोहित बाबर (येडे), तालुका सरचिटणीस नामदेव जाधव, समीर होवाळ, सुबोध सरतापे, विजय होवाळ, कुलदीप पवार, मंगेश होवाळ (सर्वजण तडसर), तालुका सरचिटणीस विकास भिंगारदेवे, लक्ष्मण खिलारे, अक्षय जाधव, श्रेयस परिट (सर्वजण चिखली) यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, अमोल देशमुख उपस्थित होते.

Post a Comment
0Comments